या ब्लॉग मधून काय शिकाल?

कष्टाची किंमत मिळते, कौशल्याचे मूल्य मिळते. म्हणून कौशल्य आत्मसात करा. ज्या क्षेत्रात असाल त्यातले तज्ञ व्हा. अगदी बूट पॉलीश जरी करत असाल तरी त्यातले कौशल्य आत्मसात करा. लोक पॉलिश साठी दोन नाही दोनशे रुपये सुद्धा देतील.

 

एका जहाजामध्ये काहीतरी बिघाड होतो. यामुळे जहाज समुद्रात नेणे अशक्य होऊन बसते. जहाजाचे कर्मचारी सगळं जहाज तपासून पाहतात, पण त्यांना दोष काही सापडत नाही. अथक प्रयत्न करूनही जेव्हा त्यांना अपयशच येतं तेव्हा ते जहाज बांधणी मधील तज्ञ व्यक्ती ला बोलावतात. तो इंजिनियर येतो संपूर्ण तपासणी करतो… जहाजाच्या एका पॅनल मधील स्क्रू ढिल्ला झालेला असतो, त्यामुळे संपूर्ण बॉडी मध्ये प्रॉब्लेम तयार झालेला असतो. इंजिनियर तो स्क्रू पुन्हा पक्का बसवतो आणि जहाज पूर्ववत होते.

जाताजाता तो इंजिनियर त्याचे बिल जहाज कंपनीकडे सुपूर्द देतो आणि निघून जातो. ते बिल असतं दहा हजार रुपयांचे. एक स्क्रू पक्का बसवण्यासाठी दहा हजार रुपये कंपनीला जरा जास्त वाटतात म्हणून ते त्यांच्या एका कर्मचाऱ्याला त्या इंजिनियर कडे बिल दुरुस्त करायला पाठवतात. कर्मचारी जातो आणि इंजिनियर ला एक स्क्रू पक्का बसवण्याचे इतके बिल होऊ शकत नाही, बिल कमी करा असे सांगतो.

इंजिनियर त्या कर्मचाऱ्याच्या हातात नवीन बिल सोपवतो.
त्यात लिहिलेले असते स्क्रू पक्का बसवण्याचे शुल्क रु. १/- आणि कोणता स्क्रू ढिल्ला आहे हे शोधण्याचे मूल्य ९,९९९/-

यावरून तुम्हाला मूल्य आणि शुल्क (किंमत) यातला फरक लक्षत आला असेल अशी अपेक्षा करतो. मी एखाद्याला कन्सल्टिंग करतो तेव्हा त्यासाठी माझी कन्सल्टिंग आकारतो. त्यावेळी सुद्धा हि समस्या जाणवते. लोकांना वाटत कि दोन तास बोलायचे एवढे शुल्क कशाला. पण ते शुल्क नसते तर मूल्य असते माझ्या ज्ञानाचे, बुद्धीचे आणि वेळेचे. लोकांना समजावून सांगण्याच्या फंद्यात मी पडत नाही, कालांतराने व्यवसायात समस्या जाणवायला लागल्या कि ते पुन्हा माझ्याकडेच येणार असतात. ते ग्राहक म्हणून आपल्या फी ला शुल्क म्हणून पाहत असतात आणि आपण व्यवसायिक म्हणून आपले मूल्य ठरवत असतो.

असो… तुम्हाला तुमच्या कामाचे मूल्य ओळखता आले पाहिजे. कित्येक ठिकाणी तुम्ही पहिले असेल कि पारंपरिक कला असलेल्या लोकांकडून हाताने बनविलेल्या वस्तू अतिशय कमी किमतीत घेतल्या जातात. त्या उत्पादकांना आपल्याकडून पन्नास रुपयांना घेतलेली कलाकुसर बाहेर मार्केटमधे हजार रुपयांना विकली जाते हे माहीतही नसते. ते मिळेल तेवढे पैसे घेतात याचे कारण त्यांना त्यांच्या कौशल्याचे मूल्य माहित नसते. त्यांना फक्त त्यांच्या कामाची किंमत माहित असते. एखादा कलाकुसरीचा टेबल हजार रुपयांना मिळत असेल तर तोच टेबल एखाद्या मोठ्या ब्रॅण्डच्या नावाखाली लाख रुपयाला सुद्धा विकला जाऊ शकतो. कारण त्या ब्रँड ने आपल्या वस्तूचे मूल्य ठरवलेले असते किंमत नाही. रोल्स रॉयस कार मध्ये सात आठ कोटी खर्च करावेत असं काही नाही पण त्या ब्रँड चे मूल्यच इतके मोठे हे कि ती किंमतही तुम्हाला त्या गाडीसमोर फिकी वाटते. एखादी पेंटिंग करोडो रुपयांना विकली जाते याचे कारण तिचे मूल्य आहे, किंमत नाही.

आपल्या कामाचे मूल्य ओळख, किंमत तर सगळेच करतात. तुम्हाला तुमच्या कामाचा परतावा शुल्क म्हणून नाही तर मूल्य म्हणून ज्यावेळी मिळायला लागते त्यावेळी तुमची यशाकडे भक्कम वाटचाल सुरु झालेली असते हे लक्षात घ्या.

 

Originally written by – Shrikant Avhad (Udyojak Mitra) / Edited by – Startup Maharashtra Team