सेल्स (विक्री) विभाग हा व्यवसायातील एक महत्वाचा भाग आहे. व्यवसाय म्हणजे विक्री. तुम्ही तुमचे प्रोडक्ट विकू शकत असाल तरंच तुम्ही व्यवसाय करू शकता, आणि या विक्रीसाठीच आवश्यक असते कार्यक्षम सेल्स टीम.

बरेच जण चांगली सेल्स टीम डेव्हलप करण्यात कमी पडतात. पगाराचा पैसा वाचवण्यासाठी सेल्स कर्मचारीच नियुक केले जात नाहीत. हे म्हणजे दररोज जेवणावर खूप खर्च होतो म्हणून जेवणच सोडून द्यायचं असं काहीसं लॉजिक झालं. पण यामुळे व्यवसायासाठी आवश्यक असलेली सेल्स टीम तयारच होत नाही, याचा थेट परिणाम व्यवसायाच्या विक्रीवर होतो. आणि यामुळे व्यवसायाला उतरती कळा लागते.

कुशल अनुभवी मार्केटची माहिती असलेले सेल्स कर्मचारी व्यवसायाच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असतात. या लोकांना मार्केट माहित असतं, विक्री करण्याचे कौशल्य अवगत असते, यांचे संभाषण कौशल्य विकसित झालेले असते, थोडक्यात मार्केटमधे जम बसवण्यासाठी ज्या गुणांची आवश्यकता असते ते यांना अनुभवाने प्राप्त झालेले असतात.

 

मार्केटची माहिती असणारा, रिझल्ट देऊ शकणारा व्यक्ती पगार जास्त द्यावा लागला तरी जॉईन करून घेण्यात काहीच हरकत नसते. लघुद्योगात एकाच वेळी मोठी सेल्स टीम तयार करणे शक्य नसते. पण एक एक करत चांगली माणसे निवडून टप्प्याटप्प्याने ती व्यवसायात जोडून घेणे आवश्यक असते. मोठ्या व्यवसायात तर याशिवाय पर्यायायच नसतो.

 

या सेल्स टीम ची योग्य रचना असावी. एक मुख्य सेल्स लीडर असावा, जो त्याच्या खाली चांगली सेल्स टीम तयार करून तिला लीड करू शकेल. त्याखालोखाल विक्री प्रतिनिधींची एक टीम जी पूर्ण मार्केट कव्हर करू शकेल अशी सामान्य रचना असावी. लघुद्योगात गुंतवणुकीचा विचार करता सुरुवातीच्या काळात मुख्य सेल्स लीडर स्वतः मालक असू शकतो, पण हि परिस्थिती जास्त काळ नसावी. जेवढे लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर एक अनुभवी सेल्स लीडर व्यवसायात जॉईन करून घ्यायला हवा.

चांगली अनुभवी सेल्स टीम तयार करा. हळूहळू का असेना पण चांगली माणसे जोडत चला. तुमचे सेल्स नेटवर्क जेवढे उत्तम तेवढा तुमचा व्यवसाय वेगाने प्रगती करत असतो.

– मार्गदर्शन सल्ला

 

Originally written by – Shrikant Avhad (Udyojak Mitra) / Edited by – Startup Maharashtra Team