व्यवसाय सुरु केल्यानंतर सुरुवातिची मार्केटींग कशी असावी, पहीले एक वर्ष आर्थिक दृष्ट्या कसे असते याविषयी थोडक्यात माहिती

कोणत्याही उत्पादन क्षेत्राशी निगडित व्यवसाय सुरु करण्याची पद्धत सोपी असते. व्यवसायाची नोंदणी करणे, लायसन्स वगैरे काही आवश्यक असेल तर त्याची पूर्तता करणे, व्यवसाय उभा करणे आणि प्रोडक्शन सुरु करणे… पण यानंतर काय ? आपले प्रोडक्ट मार्केटमध्ये कसे विकायचे, कसे न्यायचे, कशा पद्धतीने व्यवसायाचे अर्थशास्त्र मॅनेज करायचे याबद्दल आपल्यापैकी बहुतांश नवउद्योजकांना काहीच कल्पना नसते. यामुळे व्यवसाय सुरु करण्याच्या पहिल्या पायरीवरच आपण अडकून पडतो आणि पुढची प्रगती खुंटते. याचबरोबर आपल्याला माहित नसलेले व्यवसायाचे सुरुवातीचे अर्थशास्त्र समजून घेणे सुद्धा खूप आवश्यक असते. कारण सुरुवातीच्या काही काळात आपल्याला उत्पन्न अपेक्षेप्रमाणे मिळाले नाही तर आपली निराशा होण्याची शक्यता असते… म्हणून व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळातील आर्थिक बाबी कशा असतात याचीही आपण माहिती करून घेणे आवश्यक असते.

 

म्हणूनच आपण इथे व्यवसाय उभा केल्यानंतर पुढच्या सहा महिन्यात सेल्स, मार्केटिंग व आर्थिक या बाबींचे सामान्यपणे नियोजन कसे असू शकते याबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊयात.

 

समाजा मी एखादा उत्पादनाशी (Manufacturing) निगडित व्यवसाय सुरु केला असेल तर त्याच्या पुढच्या पायऱ्या कशा असतील याची माहिती करून घेउयात… हि माहिती मी तुम्हाला पहिले वर्षभर तुमचा व्यवसाय प्रत्येक महिन्यात कशा प्रकारे पुढे सरकत असतो हे गृहीत धरून देत आहे…
__

व्यवसाय सुरु केल्यानंतरच पहीला महीना ::

असं समजूया कि मी एक एखादे फूड प्रोडक्ट बनवायचा उद्योग सुरु केला. उदाहरणादाखल आपण चटणी पकडूया.
मी कंपनी सुरु करताना मार्केट ची माहिती घेतली
अपेक्षीत ग्राहक म्हणजे किराणा दुकान, हाॅटेल ई ची यादी बनवली
या प्रत्येक किराणा दुकानात व हाॅटेलात स्वतः पॅकेट घेउन गेलो
प्रत्येकाला पाच पाच पॅकेट सँपल म्हणुन दिले
सँपल देताना त्यांना गुणवत्तेची माहिती सांगीतली
किंमतीची माहिती दिली
शंभर किराणा दुकान व हाॅटेल मधे सँपल दिले
प्रत्येकाला सांगीतलं वापरुन पहा, रिझल्ट बघा, मग आॅर्डर द्या…

या महीन्यात उत्पन्न शुन्य आहे, फक्त खर्च चालू आहे
____

दुसरा महीना ::

ज्यांना ज्यांना सॅंपल दिले आहे त्या प्रत्येकाकडे सरासरी पाच दिवसांनी परत गेलो…
५० जण म्हणाले माल विकला गेला, उरलेले पन्नास म्हणाले माल अजुन तसाच आहे
ज्यांचा माल गेला त्या पन्नास पैकी पाच म्हणाले टेस्ट आवडली आहे लोकांना, एक बाॅक्स टाका…
ही माझी व्यवसायाची सुरुवात…
दुसऱ्या दिवशी पाच दुकानात/हाॅटेलात माल टाकला…
दोघांनी लगेच पैसे दिले तिघांनी दोन दिवसांनी देतो म्हणुन सांगीतले…
सुरुवातीला थोडी तडजोड करावी लागते, उधारी मान्य केली

या काळात मी आर्थीक दृष्ट्या मी तोट्यात आहे, पण ग्राहक मिळायला लागले
____

तीसरा महीना ::

माल टाकायला सुरुवात झाली
सोबत आणखी काही ग्राहकांना सँपल दिले
पहील्या शंभर पैकी जे पन्नास बाकी होते त्यातल्या काही जणांनी व नवीन मार्केटींग करताना काही जणांनी असे एकुन आणखी पाच जणांनी माल टाकायला लावला…
आता माझ्याकडे दहा ग्राहक झाले…

मी अजुनही आर्थिकदृष्ट्या तोट्यात आहे, पण ग्राहक १००% नी वाढलेत…
___

चौथा महीना ::

या दहा ग्राहकांना योग्य माल पुरवण्याचे काम सुरळीत सुरु झाले…
हळूहळू मार्केटमधे माझ्या प्रोडक्ट ची मागणी वाढली
आणखी दहा दुकानदारांनी मला ऑर्डर दिली
त्यांनाही माल टाकायला लागलो
आता मी एकुन २० जणांना माल देतोय

या महीन्यातही मी पुर्णपणे तोट्यात आहे… पण ग्राहक आणखी १००% नी वाढलेत. म्हणजेच पहिल्या ऑर्डर नंतर २००% वाढ झाली आहे.
_____

पाचवा महीना ::

आता माझ्या ग्राहकांशी माझे चांगले संबंध झालेत
मी त्यांच्याकडून रेफरन्स घेतले
प्रत्येकाकडुन किमान पाच रेफरन्स घेतले
म्हणजे एकुन १०० रेफरंस मिळाले, सोबतच आणखीही काही पन्नास एक अपेक्षित ग्राहकांची यादी मिळविली
या सर्व दीडशे जणांना भेटलो

या महीन्यात नवीन ग्राहकांत प्रगती नाही पण आहे त्यांच्याकडून ऑर्डर वाढली आहे… कारण त्यांच्या ग्राहकांची मागणी वाढली

व्यवसाय अजुनही तोट्यातच आहे, पण तरिही ऑर्डर वाढली आहे…
_____

सहावा महीना ::

ज्या नवीन १५० रेफरंस ला भेटलो त्यांच्यापैकी २० जणांनी होकार दर्शवला
आता ग्राहक एकुन ४० झाले
प्रत्येकाला चांगला माल पुरवायला सुरुवात केली
खवैय्यांची मागणी वाढली
दुकानदारांकडुन, हाॅटेल चालकांकडून ऑर्डर वाढायला लागली….

माझा तोट्यात व्यवसाय करण्याचा हा शेवटचा महीना…

आता माझा व्यवसाय सुरु झाला…
______

यापुढचे सहा महीने ना नफा ना तोटा किंवा अतिशय किरकोळ नफा या प्रकारेच चालतील
पण माझे ग्राहक आणि माझ्या ऑर्डर वाढत असतील… आता ग्राहकांचा गुणाकार सुरु होईल… 
म्हणजे धंदा वाढतोय..

धंदा वाढला कि नफा आपोआपच मिळत असतो, म्हणुन पहीले वर्षभर मी आर्थिक नफ्याकडे लक्ष न देता माझा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहील

वर्षभरानंतर मग आर्थिक नफा आणि व्यवसायात वाढ याचे योग्य नियोजन जुळवून व्यवसायाची पुढील पायरी पार करेल, मोठ्या प्रमाणावर जाहिरात कॅम्पेन हे एक वर्षानंतर सुरु करणे हे कधीही फायद्याचे असेल.
______

इथे फूड प्रोडक्ट उदाहरणादाखल घेतले आहे. याऐवजी आपण स्टील प्रोडक्ट घेतलं तर त्याचे अपेक्षित ग्राहक वेगळे असतील. केमिकल प्रोडक्ट घेतलं तर त्याचा अपेक्षित ग्राहक वर्ग वेगळा असेल, पण प्रत्येकापर्यंत पोचण्याची पद्धत सारखीच आले. यात जास्तीत जास्त १०% बदल होऊ शकतो.

तुमचा घरगुती व्यवसाय असो वा चांगली मोठी कंपनी असो सुरुवात अशीच असते… घरगृती व्यवसायात तुम्ही स्वतः फिरता, मोठ्या व्यवसायात आधी तुमचा विक्री प्रतिनिधी फिरतो नंतर तुम्ही…

पहीले सहा महीने हातात काहीच येत नाही, पुढचे सहा महीने तुम्ही काही गमवत नाही…. 
आणि यानंतर तुम्हाला कुणी थांबवू शकत नाही

हे थोडं अवघड वाटेल… पगारासारख्या उत्पन्नाची अपेक्षा असणाऱ्यांना थोडं त्रासदायक ठरेल…
पण व्यवसाय असाच असतो…
यात बदल होत नसतो.

यासोबतच प्रगती फक्त आर्थिक बाबींवर तपासली जात नाही. तुमची ग्राहक संख्या, उलाढाल आणि निव्वळ उत्पन्न या तीनपैकी तुम्ही कोणत्याही दोन बाबतीत प्रगती करत असाल तर तुमचा व्यवसाय योग्य चालला आहे असे समजायला काहीच हरकत नाही.

 

Originally written by – Shrikant Avhad (Udyojak Mitra) / Edited by – Startup Maharashtra Team