हा ब्लॉग कुणासाठी?

डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय आणि डिजिटल मार्केटिंचे कोणकोणते प्रकार आहेत. तुम्ही नवीन ब्रँड सुरु केलेला असेल किंवा तुमच्या असलेल्या व्यवसायासाठी ऑनलाईन मार्केटिंग करण्याचा विचार करत असाल तर मार्केटिंग कुठून करावे? तुमचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस डिजिटल मार्केटिंगद्वारे विकले जाऊ शकते का? इत्यादी प्रश्नांची उत्तरे या ब्लॉग मधून आपल्याला मिळतील.

या ब्लॉग मधून काय शिकाल?

  1. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?
  2. डिजिटल मार्केटिंग चे प्रकार
  3. तुमचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस डिजिटल मार्केटिंगद्वारे विकले जाऊ शकते का?
  4. नेमकी डिजिटल मार्केटिंग ची सुरुवात कुठून करावी?

भारतात वार्षिक 18% दराने इंटरनेट यूजर्स मध्ये वाढ होत आहे तसेच 2019 वर्ष संपताना भारतात 62 करोड लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचले असेल. 97% लोक इंटरनेट मोबाईल फोन वर वापरणे पसंद करतात. तसेच नियमितपणे इंटरनेट वापरकर्त्यांपैकी 20 करोड यूजर्स हे ग्रामीण भागात राहतात. ग्रामीण भागात इंटरनेट चा प्रसार हा तब्बल 35% दराने होत आहे जो तुलनेत शहरांत 7% दराने होत आहे.

स्वस्तात मिळणारा डेटा आणि इंटरनेट चा प्रसार कधी नव्हे इतक्या प्रमाणात भारतीय जनतेला इंटरनेट वर घेऊन येत आहे आणि त्यामुळेच मोबाईल फोन वरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि गुजरात या चार राज्यात संपूर्ण भारताच्या इंटरनेट यूजर्स पैकी 36% लोक राहतात आणि महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या 56%  लोक मोबाईल वर इंटरनेट वापरतात. त्यामुळे या 4 राज्यांत आणि प्रामुख्याने महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात इंटरनेट बेस्ड बाजारपेठा पुढील 10 वर्षांत मोठ्या प्रमाणात उभ्या राहतील. पारंपारिक मार्केटिंग पेक्षा इंटरनेट द्वारे केलेली मार्केटिंग हि स्वस्त आणि परिणामकारक असल्याने नवउद्योजक डिजिटल मार्केटिंग च्या पर्यायाकडे वळताना दिसत आहेत.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

इलेक्ट्रॉनिक साधने वापरून केलेले प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस चे मार्केटिंग म्हणजेच डिजिटल मार्केटिंग होय. फेसबुक आणि इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडिया द्वारे होत असलेल्या मार्केटिंग बरोबरच तुम्ही ऐकलेली रेडिओ वरील जाहिरात, तुमच्या मोबाईल मध्ये आलेला जाहिरात वजा टेक्स्ट मेसेज, मोबाईल वर बातम्या वाचताना मधेच आलेला जाहिरातीचा बॅनर हे देखील डिजिटल मार्केटिंगचाच भाग आहेत.

ग्राहकाला एखादे प्रोडक्ट ऑनलाईन विकणे एवढा सरधोपट डिजिटल मार्केटिंग चा अर्थ नव्हे, एखाद्या प्रोडक्ट ची ग्राहकांमध्ये ऑनलाईन डिमांड तयार करणे आणि ग्राहकांच्या गरजा ओळखून ते प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हि प्रोसेस म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय. मार्केटिंग हे नेहमीच योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी तुमच्या पोटेन्शिअल ग्राहकांना जोडले जाणे याच्याशी निगडित राहिले आहे.

 

महाराष्ट्रातील प्रत्येक १० लोकांपैकी ६ लोक मोबाईल वर प्रोडक्ट किंवा सर्व्हिस खरेदी करण्याचा विचार करत असल्यामुळे आज मोबाईल हे जाहिरात करण्याचे सर्वात योग्य ठिकाण आहे. सर्व वयोगटातील लोक आज मोबाईल वर भरपूर वेळ ऑनलाईन राहत असल्याने त्यांच्याशी निगडित सोशल मीडियाचा उपयोग करून तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिस ची डिमांड तयार करणे हे आज सहज शक्य झाले आहे.   

 

तुमचे पोटेन्शिअल ग्राहक मोबाईल-इंटरनेट चा उपयोग कशा प्रकारे करतात? कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर ते जास्त वेळ घालवतात? आर्टिकल वाचण्याकडे तुमच्या ग्राहकाचा जास्त कल आहे कि व्हिडियो बघण्याकडे? इंटरनेट वर कितीवेळा जाहिरात पाहिल्यानंतर ते आपल्या प्रोडक्ट आणि सर्व्हिस खरेदी करू शकतात? कुठल्या प्रकारची जाहिरात तुमच्या ग्राहकांसाठी योग्य असू शकते? इत्यादी प्रश्नांची उत्तरे शोधणे हाच डिजिटल मार्केटिंग शिकण्याचा पहिला टप्पा आहे.

डिजिटल मार्केटिंग चे प्रकार:

डिजिटल मार्केटिंग चे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत, ते म्हणजे ऑनलाईन मार्केटिंग आणि ऑफलाईन मार्केटिंग.

 

ऑफलाईन डिजिटल मार्केटिंग:

Enhanced offline marketing, रेडिओ मार्केटिंग, TV जाहिरात मार्केटिंग आणि फोन मार्केटिंग हे ऑफलाईन मार्केटिंग चे भाग आहेत. इलेक्ट्रॉनिक बिलबोर्डस, रेल्वे स्टेशन वरच्या TV स्क्रीन वर, किंवा खासगी प्रवासाच्या कॅब मध्ये लावलेल्या स्क्रीन वर ग्राहकांना आधी तयार केलेले व्हिडीओ सतत दाखवणे हे Enhanced offline marketing चा भाग आहे. ग्राहकांना फोन करून इंशुरन्स पॉलिसी किंवा क्रेडिट कार्ड खरेदी करायला लावणे हे फोन मार्केटिंग आहे.

 

ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग

Search engine optimization (SEO), Search engine marketing (SEM) – पे पर क्लिक (PPC), कंटेंट मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, Affiliate marketing आणि ईमेल मार्केटिंग हे ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग चे प्रकार आहेत.

Search engine optimization (SEO): हा सध्या सर्वात चर्चेत असणारा डिजिटल मार्केटिंग चा विषय आहे. जेंव्हा आपण एखादी गोष्ट गुगल वर शोधतो तेंव्हा सर्च रिझल्ट द्वारे आपल्याला पहिल्या पानावर ज्या वेबसाईट दिसतात त्या वेबसाईट्सचे प्रामुख्याने Search engine optimization केलेले असते. थोडक्यात, जेंव्हा एखादा ग्राहक एक विशिष्ट keyword घेऊन गुगल वर सर्च करेल तेंव्हा त्या शब्दाला धरून आपल्या कंपनीची वेबसाईट गुगल सर्च मध्ये सर्वात वर दिसेल हे पाहणे त्या व्यावसायिकासाठी गरजेचे आहे. आपली वेबसाईट गुगल रिझल्ट्स द्वारा जास्तीतजास्त यूजर्स ना दिसण्यासाठी वेबसाईट च्या कंटेंट मधे जे बदल केले जातात त्याला SEO म्हटले जाते. Search engine optimization करण्यासाठी Search engine म्हणून Google ला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. परंतु SEO करण्यासाठी तज्ञ व्यक्तीची आवश्यकता असल्याने, या सर्व्हिस चे पैसे मात्र व्यावसायिकांना मोजावे लागतात. इंटरनेट च्या युगात व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आपल्या कंपनीच्या वेबसाईटचे सुलभपणे SEO कसे करावे याबाबत आमचे पुढील ब्लॉग वाचत राहा.

Search engine marketing (SEM): Search engine optimization चा पेड प्रकार म्हणजेच सर्च इंजिन मार्केटिंग (SEM). ग्राहक जेंव्हा एखादा Keyword गुगल वर सर्च करतो तेंव्हा सुरुवातीला ज्या जाहिरात वजा वेबसाईट लिंक दिसतात त्यांना Search engine marketing (SEM) म्हणतात. SEO करण्यासाठी साधारण काही महिन्याचा कालावधी लागतो परंतु एखाद्या विशिष्ट Keyword वर पैसे देऊन आपण ग्राहकांना आपल्या वेबसाईटवर Search engine marketing द्वारे कमी वेळात घेऊन येऊ शकता. या जाहिराती प्रामुख्याने Pay per Click (PPC) प्रकारच्या असतात. ग्राहकाने तुमच्या जाहिरातीवर क्लिक केले तरच तुम्हाला त्या जाहिरातीसाठी पैसे मोजावे लागतात.

कन्टेन्ट मार्केटिंग: तुमच्या ब्रँड विषयी जागरूकता तयार करणे, तुमच्या वेबसाईटवर जास्तीतजास्त ग्राहकांचे ट्रॅफिक आणणे, विक्रीसाठी लीड तयार करणे, ग्राहकांना थेट विक्रीचे चॅनल्स तयार करण्यासाठी ब्लॉग, ईबुक्स, ऑनलाईन ब्राऊचर्स, कॅटलॉग तयार करणे हे कन्टेन्ट मार्केटिंगचे पर्याय आहेत. तुमची सर्व्हिस किंवा प्रोडक्ट च्या विक्रीसाठी, किंवा ब्रँड मोठा होण्याच्या उद्देशांना ध्यानात घेऊन तयार केलेला कन्टेन्ट तुमच्या पोटेन्शिअल ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हे कन्टेन्ट मार्केटिंग आहे. 

सोशल मीडिया मार्केटिंग: फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया चॅनेल्स द्वारे ग्राहकांपर्यन्त ब्रँड पोहोचवणे, सोशल मीडिया द्वारे वेबसाईटवर ट्रॅफिक आणणे, लीड जनरेट करणे हे सोशल मीडिया मार्केटिंग आहे. सोशल मीडियाचा होणारा वाढता उपयोग, भारतातील 45 ते 65 वयोगटातील यूजर्स चे फेसबुक वरील मागच्या 3 वर्षांत वाढते प्रमाण, महाराष्ट्रातील Tier 1 आणि Tier 2 शहरांतून ऑनलाईन शॉपिंग कडे वाढणारा कल, फेसबुक किंवा इंस्टाग्राम द्वारे होणाऱ्या जाहिरातीचा तुलनेत असलेला कमी खर्च, सोशल मीडिया वर नवीन ग्राहकांना जाहिरात करणे आणि त्यांना रिटार्गेट करता येणे इत्यादी लक्षात घेता सोशल मीडिया मार्केटिंग कुठल्याही इंडस्ट्री मधील व्यवसायासाठी गरजेचे झालेले आहे. 

Affiliate marketing: विविध ऑनलाईन रिटेलर्स आपले प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस दुसऱ्यांच्या वेबसाईट, ब्लॉग, YouTube चॅनेल वरून प्रमोट करतात, आणि होणाऱ्या विक्रीचा ठराविक वाटा कमिशन म्हणून या प्रमोटर्स ना मिळतो. सहसा भरपूर फॉलोवर्स असलेल्या फेसबुक पेज वरून आपणांस विविध वेबसाईटवरील प्रोडक्ट प्रमोट केलेले पहायला मिळतात. आपला ग्राहक वर्ग आणि या प्रमोटर्स चा फॉलोवर बेस जर मिळता जुळता असेल तर Affiliate मार्केटिंग मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकते.       

ईमेल मार्केटिंग: एखादा विशिष्ट कन्टेन्ट, इव्हेन्ट किंवा डिस्काउंट हे प्रामुख्याने ईमेल मार्केटिंग द्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाते. तसेच ईमेल द्वारे ठराविक ग्राहकांना तुमच्या वेबसाईटकडे अथवा विशेष वेबपेज कडे पाठवले जाऊ शकते. ब्लॉग सबस्क्रिप्शन ईमेल, कस्टमर वेलकम ईमेल, फॉलोव अप ईमेल, प्रमोशन किंवा लॉयल्टी प्रोग्रॅम ईमेल, शॉपिंग कार्ट मधील प्रोडक्ट रिमायंडर ईमेल द्वारे तुम्ही ग्राहकांना तुमच्या ब्रँड विषयी सतत जागरूक ठेऊ शकता. पद्धतशीरपणे प्लॅन करून पाठवलेले ईमेल कॅम्पेन तुमच्या ब्रँड ची व्हॅल्यू वाढवू शकते.   

तुमचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस डिजिटल मार्केटिंगद्वारे विकले जाऊ शकते का?

भरपूर व्यावसायिकांना वाटते कि त्यांच्यासाठी पारंपरिक मार्केटिंग चॅनेल्सच उपयोगी आहेत आणि त्यांच्या कंपनीला इतक्यात डिजिटल मार्केटिंग ची गरज नाही. प्रामुख्याने पारंपरिक चॅनेल्स मधून त्यांच्या विक्रीचे आणि मार्केटिंगचे गणित इतक्या वर्षांच्या अनुभवातून तयार झाले असल्यामुळे या व्यावसायिकांना असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु २०२० नंतर पारंपरिक दुकानापेक्षा ऑनलाईन होणारी खरेदी वाढतच जाणारी आहे. २०३० पर्यंत १० पैकी ९ भारतीय माणसाकडे सुपरफास्ट इंटरनेट कनेक्टिव्हीटी असणार आहे. त्यामुळेच काळाची पावले ओळखून सर्व व्यावसायिकांना उद्याच्या तयार होणाऱ्या ऑनलाईन बाजारपेठेसाठी आजपासूनच आपल्या कंपनीच्या सर्व सर्व्हिस आणि प्रोडक्ट ऑनलाईन घेऊन येणे गरजेचे आहे. कुठलाही व्यवसाय असो आणि कुठलीही इंडस्ट्री असो ऑनलाईन येणे आणि डिजिटल मार्केटिंग च्या जोरावर ग्राहकांपर्यंत पोहोचणे हे इथून पुढे नितांत आवश्यक आहे.

 

नेमकी डिजिटल मार्केटिंग ची सुरुवात कुठून करावी?

या प्रश्नाचे उत्तर फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरून मार्केटिंग करा असे अजिबात नाही. उलट तुमचा ग्राहक मोबाईल वर ऑनलाईन असताना काय करतो हे समजून त्याच्या स्क्रीनवर ज्या प्रकारे पोहोचता येईल त्या सर्व बाजूंनी तुम्ही तुमची डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटर्जी तयार करायला हवी. सुरुवातीला तुमच्या ग्राहकांची ऑनलाईन वागणूक समजून घेणे हे महत्वाचे आहे.

 

स्टार्टअप महाराष्ट्र टीम टिप्स:

तुमच्या ग्राहकांचे साधारण वयोगट काय? इंटरनेट वर ते जास्त काय पाहतात? जसे कि १८ ते ३४ वयोगटातील ग्राहक वर्ग हा वाचन करण्यापेक्षा व्हिडीओ बघण्याकडे जास्त आकर्षित होतो तर ४५ ते ६४ वयोगटातील व्यक्तींचा बातम्या आणि त्या स्वरूपातील आर्टिकल वाचण्याकडे कल आहे. या वयोगटातील व्यक्ती सध्या कुठला ट्रेंड फॉलो करत आहेत? त्यांच्या ऑनलाईन गोष्टी विकत घेण्यासंबधी कुठल्या सवयी आहेत हे समजून आपण कुठल्या प्रकारचा डिजिटल मार्केटिंग चॅनेल निवडावा हे ठरवावे.

 

चॅनेल ठरवल्यानंतर या ग्राहक वर्गाला कुठल्या प्रकारचा कन्टेन्ट पोहोचता करणे आवश्यक आहे हे ठरवावे, फ्री अथवा पेड कुठल्या प्रकारची मार्केटिंग अपेक्षित आहे हे ठरवून तुम्ही तुमची डिजटल मार्केटिंग स्ट्रॅटर्जी तयार करू शकता. पुढील ब्लॉग मधून डिजिटल मार्केटिंग च्या प्रकारांविषयी आपण सखोल माहिती घेऊयात आणि तुमच्या इंडस्ट्री साठी आणि कंपनीसाठी कोणती स्ट्रॅटर्जी योग्य आहे याचा अभ्यास करूयात.

 

Written By Tushar Pakhare (Co founder at Ghongadi.com & MotherQuilts.com)